Saturday, 21 April 2018

Beyond Vulture's Culture

The present cases of rapes in India is developing a sense that human being has started nurturing a brutal face which is Beyond Vulture's culture. We are unable to understand the barbarous stance of a "HUMAN" when merely four month girl child is raped. We must vow to eradicate these inhuman nature to protect "Real Human Culture".

Wednesday, 22 November 2017

दै. हिंदुस्थान दिवाळी अंकात प्रकाशित लेख @ अविनाश मोहरील

पाटी फुटलीशाळा बुडली!!

शाळा सुटली, पाटी फुटली, आई मला भुक लागलीअशी आरोळी मारणाऱ्या सामान्य मुलांचा तो मराठी माध्यमाचा माझा वर्ग मला आठवतो. एका सामान्य पद्धतीच्या इमारतीमधे भरणारी, खाकी पँट पांढरा शर्ट असा गणवेश असलेली आमची शाळा सकाळी ११ वाजता सुरु व्हायची. प्रार्थनेसाठी जेव्हा आमचे गुरुजी आम्हाला रांगेत उभे करायचे तेव्हा सहजच डोक्यावरुन त्यांचा प्रेमाने हात फिरायचा आणि खोड्या केल्या तर सट्कन पाठीवर मारही पडायचा. मग आम्ही सारे हात जोडून प्रार्थना म्हणायचो.. “नमो मातृभुमी सदा वंदीतो मी..” त्यानंतर प्रतिज्ञा, त्यानंतर बँडच्या तालावर राष्ट्रगीत. आमचे वर्ग सुरु व्हायचेधमाल असायची वर्गांमधे..शिस्त होती परंतू त्या शिस्तीचे दडपण कधी आमच्यावर आले नाही. मराठी भाषेतील सुंदर कविता, राजे छत्रपती आणि त्यांच्या मावळ्यांचा इतिहास, पाढे पाठ करणे, पाटीवर लेखणीने लिहून वारंवार करुन बघितलेली गणिते, नागरिकशास्त्रामधील उपराष्ट्रपतींचे संविधानिक महत्व, दोन लेखणींच्या बदल्यात मित्राकडून मिळविलेल्या दोन जेष्ठमधाच्या काड्या, ॲल्युमिनीअमच्या पेटीचे दफ्तर, ती पेटी हात मारुन कोपऱ्यात चपवून टाकली म्हणून मित्राशी झालेले भांडण नंतर दोघांनाही गुरुजींचा पडलेला मार, शेतातून पकडून आणलेले रिकाम्या काडेपेटीत ठेऊन मित्रांना दाखविण्यासाठी नेलेले सोनपाखरु, वहीच्या पानामधे ठेवलेले जाळीदार पिंपळपान, शाळेच्या मैदानावर खोखो खेळताना फुटलेले टोंगळे, स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ऐटीत दिलेले आयुष्यातील पहिले भाषण, आणि शेवटची घंटा झाली की सर्वांनी जोरात मारलेली ती आरोळी… “आई मला भूक लागली..” माझ्या मराठी माध्यमाच्या त्या शाळेतील अनेक रमणीय स्मृती अजूनही माझ्या माझ्या बालमित्रांच्या स्मरणात अगदी ताज्या आहेत. त्या सर्व स्मृती एखाद्या चलचित्रागत माझ्या मनात सरकू लागल्या जेव्हा मी माझ्या शाळेच्या फाटकातून आतमधे शिरलो. ज्या शाळेने माझे बालपण सुरम्य केले होते, ज्या परीसरामधे मला अत्यंत जीवलग असे सवंगडी मिळाले होते त्या शाळेत मी एका कार्यक्रमाचा प्रमुख अतिथी म्हणून प्रवेश करीत होतो. फाटकातून आत प्रवेश केल्याबरोबर मी माझ्या मनातील त्या बालपणीच्या रम्य स्मृतींना बाजूला ठेऊन अचानक वास्तवात आलो कारण मला जे चित्र त्या ठिकाणी दिसले ते दाहक वेदनादायी होते

ज्या मैदानावर सायंकाळी जवळपास आठ ते दहा प्रकारच्या खेळांमधे मुले-मली सहभागी व्हायच्या, ज्यांच्या चैतन्यमयी वास्तव्याने ते मैदान अक्षरशः फुलून यायचे त्या मैदानाचा बराचसा भाग रानटी झाडांनी व्यापलेला होता. काही भागात मोकाट गुरे फिरत होती आणि आमच्या बालपणीच्या वेळेचे व्हॉलीबॉलचे खंबे वाकलेल्या स्थितीत माझ्या मनाची वेदना आणखी वाढवत होते. त्या मैदानावर आता कुणीही खेळत नाही असे मला कळले. शाळेच्या इमारतीची अक्षरशः वाताहात झाली होती. साधारण तीस वर्षांपूर्वी ज्या इमारतीत आम्ही शिक्षण घ्यायचो त्याच इमारतीत आजही शिक्षण सुरु होते. वर्गांची स्थिती देखील भयावह होती. जागोजागी फ्लोअरींग उखडलेले होते, त्या मातीतच मुले बसली होती, खिडक्या तुटलेल्या होत्या, वर्गातील फळे घाण होते आणि या सर्व बाबींचा परीणाम म्हणूनच की काय वर्गांमधे विद्यार्थिसंख्या देखील अत्यल्प होती. मी शाळेत शिकत असताना प्रार्थनेच्या वेळी मी गट प्रमुख म्हणून जोराने सांगायचो, गुरुजी पटसंख्या एक हजार पन्नास पटावर हजर एक हजार तेवीसहजाराच्यावर विद्यार्थी संख्या असलेल्या आमच्या त्या शाळेत आज सर्व वर्ग मिळून केवळ १८२ विद्यार्थी शिल्लक आहेत. त्यापैकी अर्धे विद्यार्थी प्रवेश घेतानाच शाळेत येण्याचा आग्रह केला जाणार नाही या अटीवर प्रवेशित झालेले आहेत. त्या दिवशी अनेक वर्षांनंतर माझ्या शाळेच्या प्रार्थनेला मी हजर होतो आणि माझ्या बालपणी मी ज्या भूमिकेत असायचो त्याच भुमिकेतील गट प्रमुख जोरात ओरडलागुरुजी, पटसंख्या एकशे बँशी पटावर हजर एकोणसत्तरमला कळलेच नाही माझ्याही नकळत माझ्या डोळ्यातून काही अश्रू ओघळले.. पाटी फुटली होती आणि शाळा बुडत होती. माझी मातृभाषा शिकविणारी माझी मराठी माध्यमाची शाळा अक्षरशः तिच्या अस्तित्वाचे अंतिम श्वास घेतेय की काय असे मला वाटून गेले. मला काही सुचेना. मी त्या मुख्याध्यापकांना म्हणालो की सर मला अस्वस्थ वाटतेयमी काहीही बोलू शकणार नाही. त्यांना माझी अवस्था लक्षात आली. मला ते त्यांच्या कक्षात घेऊन गेले त्यानंतर त्यांनी मला माझ्या शाळेच्या त्या भयावह आणि मरणप्राय स्थितीची कारणे सांगितली. त्यांनी सांगितलेली कारणे ऐकल्यावर मला असे वाटू लागले की इंग्रजांनी या देशावर मोजमाप करावयाचे असल्यास तीनशे वर्षे राज्य केले परंतू त्यांच्या विचारांची पाळेमुळे आपल्या जीन्समधे इतक्या खोलवर रुजली की त्या गुलामीच्या मानसिकतेमधून आपण तसेच आपली राजकीय आणि प्रशासनिक व्यवस्था देखील बाहेर पडू इच्छित नाही

मराठी माध्यमांच्या शाळा संपूर्णपणे संपवून या सबंध व्यवस्थेला खाजगीक्षेत्र बनविण्याच्या दृष्टीने प्रशासनाचा विचार पावलोपावली जाणवू लागला आहे. दुर्दैवाने राजकीय व्यवस्था देखील याच भुमिका जोपासण्याचे कार्य करताना आढळते. प्रशासनामधील एक विचार जो कायम वेगवेगळ्या पातळीवरुन मांडला जातो ज्या विचाराला विरोध करण्याचे सत्व शिक्षकांमधेही उरलेले नाही तो विचार म्हणजे सध्याचे सरकारी अनुदानावर सुरु असलेले शिक्षण क्षेत्र शून्य उत्पादन मुल्याचे क्षेत्र बनलेले आहे. शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकच बाब ही आता रोजगार निर्मिती कौशल्याभिमुख विषयांच्या दृष्टीने बघितली जातेय. बदलत्या काळात त्याची आवश्यकता वाढलीय हे देखील मान्य करावे लागते. परंतू याचा अर्थ परंपरागत शिक्षण पद्धती परंपरागत विषय हे अगदीच निरुपयोगी झालेत असा त्याचा अर्थ काढणे किती धोकादायक आहे. इतिहास, भाषा, तत्वज्ञान, राज्यशास्त्र यासारख्या विषयांच्या आधारे मनुष्यनिर्मितीची जी प्रक्रीया विशेषतः या मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळांमधून सुरु होती ती खंडीत झाली कारण या शाळांना निरुपयोगी असे सर्वांकडूनच घोषित करण्यात आले. या शाळांमधून दिले जाणारे संस्कार, या शाळांमधे म्हणली जाणारी गाणी, या शाळांमधून मनात रुजविल्या जाणाऱ्या विविध विषयांमधील संकल्पना या सर्वच बाबींकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. पहिला घटक म्हणजे पालक वर्गाला या शाळांमधील शैक्षणिक प्रक्रीया निरुपयोगी वाटतेय. संस्कार मिळाले नाहीत तरी चालतील परंतू पाल्य इंग्रजीत बोलायला हवा, त्याला विषयांमधील संकल्पना कळल्या नाहीत तरी चालतील परंतू त्याच्या सारे पाठ असायला हवे. एकंदरीत तो मातृभाषेतून शिक्षण घेऊन संस्कारी मुलगा झाला नाही तरी चालेल परंतू तो इंग्रजी बोलणारा पोपट व्हायला हवा ही भावना सर्वदूर पसरलेली आहे. म्हणूनच कुणीही पालक मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या या शाळांना प्राधान्य देतच नाही. विद्यार्थीच येत नसल्याने या शाळांमधील शिक्षकांनाही काहीच नवीन कल्पक करावे वाटत नाही. कारण त्यांच्या नोकऱ्या पटसंख्येशी जोडलेल्या असल्याने कसेही करुन मुलांचे प्रवेश मिळवायचे असा विचार त्यांच्या मनात रुजला आहे. दारुण स्थिती अशी आहे की आपल्या नोकऱ्या वाचविण्यासाठी आपण अतिरीक्त ठरु नये याकरीता हे सारे शिक्षक ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसारखे गावोगाव मुलांच्या टीसी गोळा करत फिरतात त्या बदल्यात पालकांना दहा हजारापर्यंत रक्कम देखील दिली जाते. मुलांना गणवेष, पुस्तके, सायकल यासारखी आमीषे दाखविली जातात त्या बळावर प्रवेश मिळविले जातात. बरेच वेळा मुलगा शाळेत येणार नाही अश्या अटी मान्य करुनही प्रवेश करावे लागतात कारण शेवटी त्या शिक्षकांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो. जोवर शिक्षकाचे पद पटसंख्येशी जोडलेले आहे तोवर ही स्थिती अशीच राहणार. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुटीत आम्ही शिकत असताना आमचे शिक्षक नव्या सत्रामधे कोणते उपक्रम राबवायचे याबाबत चर्चा नियोजन करीत असत, आजचे शिक्षक कोणत्या गावातून विद्यार्थी मिळतील यावर्षीची टीसी मिळविण्यासाठीची बोली किती असेल याबाबत विचार करतात. अश्या पद्धतीने केलेल्या प्रवेशांच्या आधारावर गुणवत्ता येणार कशी हा सर्वात महत्वाचा भाग आहे

या सर्व प्रकारामुळे या शाळांमधील शिक्षकदेखील नैराश्यग्रस्त आहेत. वर्षाकाठी पन्नास ते साठ हजार रुपये या गैरकामासाठी त्यांना द्यावे लागत असल्याने ते काहीच करु इच्छित नाहीत. तसेही प्रवेश जर याच पद्धतीने मिळवायचे आहेत तर मग कशाला अध्यापन करायचे ही भूमिका त्यांची देखील तयार होतेय. या सर्व शाळांना शासनाकडून गेल्या अनेक वर्षांपासून पूर्ण स्वरुपात वेतनेतर अनुदान प्राप्त झालेले नाही या शाळांना विद्यार्थ्यांकडून शुल्कदेखील घेता येत नाही. या सर्व शाळांची भौतिक अवस्था अतिशय दारुण आहे. पिण्याचे स्वच्छ पाणी किंवा शौच्चालय यासारख्या मुलभूत सुविधा देखील या शाळंमधे नाहीत. प्रशासनाला या शाळा शून्य उपयोगीता असलेल्या वाटतात त्यामुळे यावर खर्च करण्यास शासन प्रशासन दोन्हीही तयार नाही. या सर्व शाळांमधे शिक्षक नेमणूक करण्याची परवानगी नाही. परवानगी दिली तरी केवळ इंग्रजी, विज्ञान किंवा गणित विषयांसाठी ती देखील मर्यादित स्वरुपात देण्यात येते. इतर विषयांना शिक्षक नकोत किंवा ते विषय शिकविले नाहीत तरी चालू शकते किंवा इतिहास, राज्यशास्त्र किंवा मातृभाषा या विषयांचे महत्वच नाही या भुमिका गेल्या अनेक वर्षांपासून दृढ झाल्याने आता त्याबद्दलचे मत हे शिक्षण क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या धोरणांवरुन लक्षात येऊ शकते. ज्या शाळा खाजगी संस्थांच्या माध्यमातून संचालित केल्या जातात त्या ठिकाणी शिक्षक भरती बंद असल्याने भौतिक सुविधा निर्माण करण्यामधे अपवादात्मक स्थिती वगळता या संस्थांना रस उरलेला नाही. कारण शिक्षक भरतीचे अर्थकारण संस्थेच्या विकासासाठी नाही तर संस्थाचालकांच्या विकासासाठी वापरले जावे अशीच स्थिती काही अपवाद वगळता सर्वदूर आढळते त्यामुळे अश्या खाजगी अनुदानित शाळांचीही स्थिती त्याच प्रकारची आहे. तेथेही पाटी फुटलेलीच आहे. एकंदरीत शासन प्रशासनाची मदत नाही, म्हणून प्रवेश नाहीत म्हणून शिक्षक नाहीत म्हणून पालक विद्यार्थी पाठवित नाहीत, त्यामुळे गुणवत्ता नाही त्यामुळे उपयोगीता शुन्य होते त्यामुळे शासन प्रशासन मदत करीत नाही असे हे सर्वांचेच बरोबर आहे असे वाटणारे परंतू सर्वांचेच चुकत असलेले विषवर्तुळ तयार झालेले आहे. परंतू या विषवर्तुळाच्या खेळामधे माझ्या मायबोलीचा सर्वात महत्वाचा आधार असलेली, माझ्या मायबोलीतून मला प्राप्त होणाऱ्या वेगवेगळ्या मानवी संस्कारांचा स्रोत असलेली, वेगवेगळ्या विषयांच्या मुलभूत संकल्पना माझ्या मनात रुजविणारी मला शिक्षणाचे ओझे वाटू देता सहज शिक्षण देणारी माझी शाळा दिवसांगणिक मरतेय.. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून काहीतरी त्वरेने करावे लागेल. ती फुटलेली पाटी जोडण्याचा त्या बुडणाऱ्या शाळा वाचविण्याचा प्रयत्न करावा लागेल.

सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आपण सर्वांनी आधुनिक काळातही इंग्रजाळलेला गुलामगीरीचा विचार त्यागण्याची गरज आहे. इंग्रजी भाषेचे आंतरराष्ट्रीय महत्व समजून देखील ती भाषा मातृभाषेच्या सरणावर चढून शिकणे अतिशय गैर आहे. “माझा मुलगा मराठी लर्न करतो पण टॉक करताना मात्र ही इज नॉट ऑलराईटअसे वाक्य आपल्या मुलाबद्दल कौतुकाने सांगणाऱ्या मॉमला काय सांगावे? सुधारलेल्या समाजाच्या संकल्पनांमधे इंग्रजी बोलणारा व्यक्ती हाच काय तो अतिशिक्षित बाकी निम्न दर्जाचे शिक्षित ही भावनाच या सबंध प्रक्रीयेच्या मुळाशी आहे. आपल्या पाल्यांचा विकास कसा करायचा आहे याबद्दल पालकांच्या संकल्पना स्पष्ट व्हायला हव्यात. त्याच्या जीवनात त्याने चांगल्या, समाधानी आनंदी आयुष्याला सामोरे जावे असे वाटत असल्यास त्या पाल्याला तणावमुक्त ठेवण्याचे प्रयत्न करण्याची गरज आहे. परंतू दुर्दैवाने पालकांनीच प्रचंड मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण करणे सुरु केल्याने पाल्यांना आनंदाचा श्वासही घेता येत नाही. लहानपणापासून त्याच्यावर वेगवेगळ्या परीक्षांचे ओझे टाकलेले असते, त्या परीक्षांमधील त्याच्या गुणांवरुन त्याची योग्यता ठरविण्याची अत्यंत चुकीची पद्धत सरसकट वापरली जाते. मुलांसमोर आव्हाने ही केवळ गुण प्राप्त करण्याची आहेत. जीवन जगताना त्याला कराव्या लागणाऱ्या वेगवेगळ्या शारीरिक मानसिक आव्हानांना त्याला सामोरी जाऊच दिले जात नाही. त्या प्रत्येक ठिकाणी पालकांनी आपल्या अतिशय लाडाच्या पाल्यांना सांभाळलेलेच असते. कोणत्याही समस्येचा सामना त्याला करु दिला जात नाही त्याला केवळ गुण मिळविण्याच्या प्रक्रीयेमधे यंत्रवत भरडले जाते. म्हणूनच मग गुणानुक्रमे प्रथम आलेला एखादा मुलगा जरा मोठा झाला की ब्ल्यू व्हेल नावाच्या मोबाईलवरील खेळातील क्रुर जाळ्यात अडकतो त्याच्या शेवटच्या पायरीवर आत्महत्या करुन आपले जीवन संपवितो. याचे साधे सरळ कारण म्हणजे त्या मुलाला गुणांच्या शर्यतीमधे वेड्यागत धावायला लावून मानसिकदृष्ट्या मजबूत बनूच दिलेले नाही. म्हणूनच केवळ गुणांचा विचार करणाऱ्या शाळांपेक्षा मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या मानसिक बळ देणाऱ्या शाळांवर विश्वास निर्माण व्हायला हवा. यासाठी शासनाद्वारे प्रशासनाला देखील आपली या शाळांबद्दलची तीशून्य उपयोगीतेची’ ‘उपयोगशून्यसंकल्पना बदलविण्यास भाग पाडणे गरजेचे आहे. शिक्षण क्षेत्राचे उपयोगीता मुल्यमापन एखाद्या कारखान्यामधील उपयोगीता मुल्यमापन प्रक्रीयेशी तुलना करुन काढता येणार नाही हे प्रशासनाच्या ध्यानात आणून द्यायला हवे नव्हे शासनाने त्यांना ते समजून घ्यायला भाग पाडावे. हा बदल झाल्यास या सर्व शाळांना निधी उपलब्ध होऊ शकेल लाखो रुपये शुल्क आकारुन चमकदार असलेल्या शाळांप्रमाणे या शाळांमधे देखील काही प्रमाणात सुधारणा होईल. या शाळांचे महात्म्य इतके जास्त आहे की त्यांना काही प्रमाणात जरी मदत करण्यात आली तरी देखील त्या त्यांच्या मुलभूत प्रक्रीयेमुळे झळाळून निघतील. या पर्यायासोबत एक आणखी सशक्त पर्याय आपल्याला समाजातून देता येईल. परदेशात ज्याप्रमाणे शाळांची जबाबदारी वेगवेगळ्या कम्युन द्वारे म्हणजेच समाजातील विविध घटकांद्वारे उचलली जाते त्याच प्रमाणे आपल्याही देशात सामाजिक जाणीवा जागृत असलेले अनेक गट कार्यरत आहेत. या गटांकडून या मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळांचे पालकत्व स्विकारण्यात यावे. वेगवेगळ्या समाजपयोगी कामांसोबतच हे देखील एक अत्यंत महत्वाचे कार्य ठरु शकते. हा प्रयोग झाल्यास या शाळांना गतवैभव प्राप्त होऊन त्यांच्या माध्यमातून मानवनिर्मितीची सर्वंकष प्रक्रीया आपल्याला पुन्हा सुरु करता येईल. या प्रक्रीयेमधे तणाव नसेल, गुण प्राप्त करण्याचा हव्यास किंवा झिंग नसेल, वेगवेगळ्या परीक्षांचे ओझे नसेल, मुलाच्या गुणांवरुन पालकांचे स्टेटस ठरविण्याची वेडी स्पर्धा नसेलयात असेल शिक्षणाचा निखळ आनंद, मुलाची नैसर्गिक मानसिक वाढ, वेगवेगळ्या परीस्थितींना सामोरे जाण्यासाठी त्याची वाढणारी सक्षमता, त्याचा मैदानावरचा वावर, मैदानावरील खेळ खेळताना त्याच्या अंगी रुजणारी खिलाडू वृत्ती, त्याच्या अंगभूत कलागुणांचा मनसोक्त विकास, सर्वात महत्वाचे म्हणजे वेगवेगळ्या सामाजिक स्थितीमधील मुलामुलींसोबतच्या त्याच्या वावरामुळे त्याच्या ठायी कायमस्वरुपी राहणारी सामजिक जाणीवअश्या संकल्पना राबविणाऱ्या परंतू सध्या मरणासन्न स्थितीमधे असलेल्या माझ्या मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या माझ्या शाळेला वाचवायलाच हवेहोय ना?

 - प्राचार्य डॉ. अविनाश भास्कर मोहरील / ९४२३१२३९०६